औरंगाबाद – आजकाल शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आता घरासमोरील ओट्यावर बसण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून टोळक्याने भवानीनगरात तुफान दगडफेक केली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे दोन गट समोरासमोर आले होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पोलीस प्रशासनाला तत्काळ दखल घेण्याची सूचना केल्याने अनर्थ टळला.
भवानीनगरातील गल्ली नं. ६ येथे दादा कॉलनीतील काही टवाळखोर ओट्यावर बसून सिगारेट पित येणाऱ्या जाणाऱ्यां महिलांची छेड काढत होते. यावर त्यांना बसण्यास मज्जाव केला असता टोळक्याने दगडफेक करण्यास सुरुवात केली. सदर घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.
यामुळे परिसरात प्रचंड तणाव असल्याने पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक मनोज बल्लाळ, राजेश जाजू, बळीराम देशमाने, विकास लूटे, अशोक महानोर, गणेश काथार, करण कपूर आदी उपस्थित होते.