ठेवा संस्कृतीचा | मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी असे संबोधले जाते. या चतुर्थीचे महत्व संकष्टी चतुर्थीपेक्षा अधिक असते. त्यामुळे अंगारकी चतुर्थीला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. मात्र या चतुर्थीला एवढे महत्व नेमके का आहे. हेच सांगणारी धार्मिक कथा आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे.
कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेशभक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टी ला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. ह्या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंकारक नामक, जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता जो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं.
त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा. ” स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायाचे वरदान ” त्यानं प्रसन्न झालेल्या श्रीगणेशा कडे मागितीला.
यावर गणेशानं सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, “ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवार ची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंकारीका ह्या नांवाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास २१ संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील”.