तासगावातील ‘त्या’ बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला तलावात

सांगली । तासगावातील शुक्रवारी पासून बेपत्ता असणाऱ्या ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह एका तलावात मिळून आला. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. प्रकाश राजेंद्र कांबळे राहणार सम्राट अशोक नगर तासगाव असे मृत युवकाचे नाव आहे. याची नोंद तासगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.

प्रकाश कांबळे हा शुक्रवारी अकरा वाजल्यापासून राहत्या घरून बेपत्ता होता. तासगाव मधील आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मागे असणाऱ्या तलावा बाहेर, त्यांचे चप्पल आणि पॉकेट स्थानिक नागरिकांना मिळू आले असता त्यांनी याची माहिती तासगाव पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तलावांमध्ये मृतदेह शोधण्याचा स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.अखेर त्यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स ची मदत घेतली.

स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, आशिष सावंत, राजू कांबळे, अभिजीत कळसेकर, सागर जाधव आणि महेश गव्हाणे या टीमने एका तासामध्ये मृतदेह तलावाच्या बाहेर काढून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेची नोंद तासगाव पोलीस ठाण्यात झाली असून, हा घातपात आहे की आत्महत्या, याचा तपास पोलीस करीत आहे.