हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने आज (दि.२०) मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्र राज्य उर्जा मंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये ग्रांपंचायतीच्या समस्या बाबत प्रदीर्घ व सकारात्मक चर्चा झाली असून स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन जोडण्याचा निर्णय व सबंधित विभागाला तात्काळ आदेश देण्यात आला आहे. यामुळे सरपंच परिषदेच्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला भरीव यश मिळाले असून सरपंच वर्गामध्ये कमालीचा आनंद पसरला आहे.
सरपंच परिषदेच्या निवेदनावर सकारात्मक चर्चा झाली असून आज रात्री पासून राज्यातील ज्या गावांची थकीत बिलासाठी वीज तोडली होती ती जोडण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत झालेल्या बैठकीत देण्यात आला.
याबाबत ठोस निर्णय १५ ऑगस्ट पर्यंत होणार असून तोपर्यंत कोणत्याही गावातील वीज तोडू नये असा आदेश देण्यात आला आहे
दरम्यान, मागील काही महिन्यापासून विदयुत विभागाने राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सार्वजनीक स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा करणाऱ्या विदयुत पंपाचे कनेक्शन तोडले होते. या निर्णयामुळे भर पावसाच्या दिवसात अनेक ग्रामपंचायती व लाखो लोक अंधारात होती. परंतु आजच्या या बैठकीत महाराष्ट्रातील स्ट्रीट लाईट चालू करणे बाबत सकारात्मक चर्चा झाली तसेच स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन जोडण्याचा निर्णय व आदेश देण्यात आला आहे. सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने केलेली शिष्टाई व राज्यभरातील परिषदेने सुरू केलेली आंदोलने हे या निर्णयामागे महत्वाचे घटक ठरले.