Monday, February 6, 2023

लोकशाहीची ताकद : पश्चिम सुपनेत ऊसतोड मजूराची थेट सरपंचपदी निवड

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
लोकशाहीची ताकद काय असते, यांची अनुभूती पुन्हा एकदा कराड तालुक्यातील पश्चिम सुपने येथे पहायला मिळाली. दुष्काळी भागातून ऊसतोडीसाठी मजूर म्हणून आलेला थेट लोकनियुक्त सरपंच पदावर विराजमान झाला आहे. बाभूळगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथून 30 वर्षांपूर्वी मजुरीसाठी (मु. पो. पश्चिम सुपने, ता. कराड, जि. सातारा) येथे आलेले रमेश रावण कोळी यांची त्याच गावाच्या सरपंचपदी निवड झाली आहे.

रमेश कोळी हे सध्या गुऱ्हाळघरावर मजुरी करतात. कोळी हे कुटुंबीयांसह मजुरीसाठी सुपने येथे आले होते. सुपने, पश्चिम सुपने, साकुर्डी, डोंगरीमाळ परिसरात गुन्हाळघरांची संख्या मोठी असल्याने कोळी यांच्यासह कुटुंबालाही रोजगार मिळाला. दत्तू पैलवान यांच्या गुऱ्हाळघरावर ते मजूर म्हणून राहिले. कष्ट आणि प्रामाणिकपणाने त्यांनी गु-हाळमालकाचा विश्वास संपादन केला. मालकाने गुन्हाळाच्या परिसरातच त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. त्यांच्या बरोबर मजुरीसाठी आलेली बाभुळगावातील आणखी चार कुटुंबेही येथे स्थायिक झाली आहेत. रमेश कोळी हे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडांसमवेत राहतात.

- Advertisement -

ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी गटाने माळी समाजातील राजेश माळी यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या गटाचे पॅनेलप्रमुख साहेबराव गायकवाड यांनी गुन्हाळ घरावरील मजूर रमेश कोळी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. निवडणूकी दरम्यान पाणी योजनेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर राजकीय आरोप- प्रत्यारोप होत होते. अशावेळी सरपंच पदावर कोण विराजमान होणार याकडे गावचे लक्ष लागून होते. तसेच स्थानिक व सत्ताधारी गट असल्याने राजेश माळी यांची वर्णी लागेल असेही मानले जात होते. गेले तीनवेळा सदस्य म्हणून कार्यकाळ बजावल्याने त्यांचीच सरपंचपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु लोकांनी काैल हा मजूर म्हणून गावात आलेले रमेश कोळी यांना दिला.

पश्चिम सुपने सत्ताधारी गड घेतला पण सिंह विरोधकांकडे 
पश्चिम सुपने ग्रामपंचायतीचा कराड तालुक्यात पहिला निकाल जाहीर झाला. ग्रामपंचायतीत 7 सदस्यापैकी 4 सदस्य सत्ताधाऱ्यांनी जिंकले तर विरोधकांनी 2 सदस्य जिंकले होते. अशावेळी 1 जागेवर समसमान 106 मते पडली होती. चिठ्ठीने निकाल ठरला अन् सत्ताधाऱ्यांना चिठ्ठीने आणखी एक जागा मिळाल्याने त्याचे 5 उमेदवार जिंकले. परंतु अशावेळी सरपंचपदी मजूर असलेले रमेश कोळी 119 मते मिळवून विराजमान झाले. तर पराभूत झालेले राजेश माळी यांना 114 मते पडली. त्यामुळे अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत लोकशाहीने मजूराला लोकनियुक्त सरपंच केले.