औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, त्यावर नियंत्रणासाठी शासनाच्या सर्व नियमांचे नागरिकांनी पालन करणे आवश्यक आहे. सध्याचा काळ कठीण आहे, परंतु औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत, असे म्हणत केंद्रीय पथकाने प्रशासनाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड 19 च्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस डॉ. दीपक भट्टाचार्य, डॉ.अभिजित पाखरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदवले, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी नीता पाडळकर आदींसह आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार सर्वत्रच झाला आहे. मृत्यूचा दर कमी करण्यावर प्रशासनाने भर द्यायला हवा. ऑक्सिजन खाटा आवश्यक त्या रुग्णांना उपचारादरम्यान मिळाव्यात. ज्यांना ऑक्सिजन खाटा आवश्यक नाही, त्यांनी अशा खाटा अडवून ठेवणे उचित नाही, त्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी. त्याचबरोबर रेमडीसीविअर इंजेक्शन, एचआरसिटी चाचणी, गृह विलगीकरण, लसीकरण, कंटेंटमेंट झोन, मनुष्यबळ क्षमता बांधणी, याबाबतही डॉ.पाखरे आणि डॉ. भट्टाचार्य यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच प्रशासनाने राबवलेल्या उपाय योजनांबाबत समाधान व्यक्त केले.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्वसमावेशक अशी कोविड परिस्थिती आणि प्रशासनाच्या उपाय योजनांबाबत पथकातील सदस्यांना माहिती दिली. यामध्ये जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील कोविड स्थिती आणि दुसऱ्या टप्प्यातील स्थिती, यावर प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या उपाययोजना, उपलब्ध सुविधा, त्यात केलेली वाढ, रुग्ण संख्या शोध, रुग्णांवर उपचार, कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी केलेले प्रयत्न, ऑक्सिजन साठा, त्याची उपलब्धता, लसीकरण मोहीम, मृत्यू दर आदीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती सादर केली, त्यावर पथकातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले. डॉ.पाडळकर यांनीही मनपाच्यावतीने शहरात राबविण्यात येत असलेली कार्यपद्धती, सर्वेक्षण, जनजागृती, कंटेंटमेंट झोन, स्टिकर्स चिटकवण्याबाबत माहिती दिली.