हॅलो महाराष्ट्रऑनलाईन : राज्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्यात निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र या नियमांमुळे कोरोनाच्या रुग्ण संख्या वर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान सध्या असलेल्या नियमांमध्ये बदल करून कडक लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याचे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीमध्ये राज्यातील लॉक डाऊन आणखीन कडक करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या अंतर्गत किराणा दुकानांमध्ये पूर्णवेळ सुरू करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र आता ही वेळ कमी करत सकाळी सात ते अकरा अशी करण्यात आली आहे. या सोबतच इतर वेगवेगळ्या यंत्रणांचे सुद्धा वेळ कमी करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहितीही समोर येत आहे.
कडक निर्णय घेतले जाण्याची शक्यता
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेतल्या जाणाऱ्या बैठकीमध्ये लॉक डाऊन संदर्भात कडक निर्णय घेतले जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून निर्बंध लादण्यात आले असले तरीही त्याचा फारसा फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत अधिक कठोर निर्णय घेतले तर कदाचित रुग्ण संख्या कमी होण्याची शक्यता आहे. यामुळेच राज्यमंत्री मंडळांमध्ये यावर आज विचारमंथन होईल असे समजते आहे.
रेमडिसिवीर आणिऑक्सिजन
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत राज्यात रेमडिसिवीर आणि ऑक्सिजन यांचा पुरवठा कमी आहे. यावरदेखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये जुंपली आहे. याच धर्तीवर रेमडिसिवीर आणि ऑक्सिजन या दोन्ही विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
लसीकरण
येत्या 1 तारखेपासून 18 वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. आणि त्याचे नियोजन यावर ही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.