सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
भारतीय सैन्य दलामध्ये युवकांना भरतीसाठी अग्नीपथ योजना केंद्र शासनाकडून सुरु करण्यात आलेली आहे. दरम्यान या योजनेला देशातील काही राज्यामधून विरोध दर्शविला जात असून काही ठिकाणी हिंसाचाराचे प्रकार घडत आहेत. याच अनुषंगाने सातारा जिल्हयामध्ये अग्नीपथ योजने विरोधात आज आंदोलन होण्याबाबत प्रसारित झालेल्या संदेशामुळे सातारा पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. शहरातील चौकाचौकात पोलिसांकडून पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आलेला आहे.
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी जिल्हावासीयांना एक आवाहन केले होते. त्यामध्ये जिल्ह्यात व शहरात कायदा व सुव्यवस्था निर्माण होतील असे मेसेज फॉरवर्ड करु नयेत. अन्यथा संबंधित व्यक्ती व ग्रुप अॅडमिनवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन अजयकुमार बन्सल यांनी केले. त्यानंतर आज कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
‘अग्निपथ’ प्रकरणावरुन काही राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. काही राज्यांमध्ये रेल्वे, बस यासह सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातही त्याबाबत 20 रोजी मिटींग होणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. यामुळे सातारा पोलिस अलर्ट झाले आहेत. दरम्यान, व्हॉट्स अॅप, फेसबुक, ट्विटर यासह विविध सोशल मीडियावर सातारा पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे.