लॉकडानदरम्यान औरंगाबादेत कडकडीत बंद, वाहनधारकांची मात्र रस्त्यांवर वर्दळ

औरंगाबाद | राज्यात वाढलेला कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाकडून विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शहरात विकेंड लॉकडाऊनचे पालनदेखील केले जात आहे. आज नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी विकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्णपणे बंद पाळला. वाढत्या कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आता शहरवासीयदेखील सरसावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शहरातील बहुतांश भागांत अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार मात्र संपूर्णपणे बंद होते. यात मेडीकल दुकाने, किराणा, भाजी विक्रेत्यांनी मात्र नियमांचे काटेकोरपणे पालन करीत, आपले व्यवहार काहीअंशी सुरू ठेवले होते. शहरात जागोजागी रस्त्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलीस प्रशासनानेही नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मात्र बहुतांश भागांमध्ये वाहनधारकांची संख्याही काही प्रमाणात पाहायला मिळाली.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यास व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरातील बाजारपेठा, व्यापारीपेठा, हॉटेल्स, मॉल यांच्यावर आधीच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र शहरातील विविध भागांत अजूनही नागरिक व वाहनधारकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळणे गरजेचे असल्याचे काहींनी सांगितले.

You might also like