११ एप्रिल रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; विद्यार्थी रस्त्यावर उतरणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | साधारण १ महिन्यापूर्वी MPSC द्वारे घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगातर्फे घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आपला आक्रोश सरकारला दाखवून दिला. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर याठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनामुळे राज्य सरकारला या प्रकरणात नमतं घ्यावं लागलं आणि तात्काळ आठवडाभरातच परीक्षा नियोजित करावी लागली. ५ वेळा परीक्षा पुढे गेल्याने संतप्त विद्यार्थ्यांचा जीव परिक्षेनंतर भांड्यात पडला. आता मात्र वेगळीच अडचण विद्यार्थ्यांसमोर उभी राहिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. मागील आठवडाभरात दरदिवशी ५० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले. बेडची संख्या मर्यादित असणं, MPSC करणारे विद्यार्थीही बाधित होणं, रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा, वीकेंड लॉकडाऊन, प्रवास करण्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांच्या मनात असलेली संभ्रमावस्था, आणि वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनावर पडलेला ताण या मूलभूत गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. हाच मुद्दा विद्यार्थी आणि राजकीय, सामाजिक संघटनांकडून आता उचलून धरला जात आहे. राज्यसेवा परिक्षेवेळीही अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३० टक्क्यांहून अधिक असल्याने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

महर्षी अगस्ती आदिवासी सेवाभावी संघटना, MPSC समन्वय समिती, मराठा विद्यार्थी परिषद या संघटनांकडून तसेच नरेंद्र पाटील, संजय मामा शिंदे या लोकप्रतिनिधींकडून या मागणीला दुजोरा देण्यात आला आहे. परीक्षा व्हावी की नाही या मागणीसाठी समाजमाध्यमांवर पोल घेण्यात येत असून यातही ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत असल्याचं दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी त्यांच्या वयोमर्यादेत २ वर्षांची सूट मिळावी ही मागणीही केली जात आहे. काही विद्यार्थी मात्र या मागणीशी सहमत नसून भले आम्हाला कोरोना होऊदे पण परीक्षा झालीच पाहिजे अशी मागणी ते करत आहेत. पुण्यासह इतर जिल्ह्यांतील स्पर्धा परीक्षार्थी आता परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार का? मुख्यमंत्री आणि आयोग या प्रकरणी काय निर्णय घेणार? हे चित्र आता लवकरच स्पष्ट होणार आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment