कमी मार्क्स दिले म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांनाच झाडाला बांधून मारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील शाळेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिक्षकांनी कमी गुण दिले म्हणून थेट त्या शिक्षकालाच आंब्याच्या झाडाला बांधून विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इयत्ता 9वीच्या 36 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या शनिवारी निकाल लागला. ज्यामध्ये 11 विद्यार्थ्यांना दोन विषयात डी श्रेणी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळेचे मुख्याध्यापक रामदेव प्रसाद केशरी यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. पण, ‘कुमार सुमन पूर्वी प्राचार्य होते, त्यांनी गुण दिले आहेत, याबाबत आम्हाला माहीत नाही’, असे सांगून मुख्याध्यापकांनी टाळाटाळ केली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी कुमार सुमन यांची भेट घेऊन प्रात्यक्षिक विषयाचे मार्क्स दाखविण्याची मागणी करण्यास सुरुवात केली, परंतु कुमार सुमन यांनी दाखवण्यास साफ नकार दिला, त्यानंतर कुमार सुमन यांच्याशी हुज्जत घातली आणि शाळेच्या आवारातील आंब्याच्या झाडाला बांधून मारहाण केली. त्यांच्यावर सामुदायिक आरोग्य केंद्र गोपीकंदर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

शिक्षक कुमार सुमन यांनी त्यांना जाणूनबुजून प्रात्यक्षिक परीक्षेत कमी गुण दिले आहेत, त्यामुळे 11 विद्यार्थी नापास झाले आहेत. असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गोपीकंदर ब्लॉकचे बीडीओ अनंत कुमार झा, ब्लॉक शिक्षण विस्तार अधिकारी सुरेंद्र हेमब्रम आणि स्टेशन प्रभारी नित्यानंद भोक्ता पोलिसांच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मारहाण केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाईही करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन लक्ष ठेवून असून, या प्रकरणाच्या खोलात जाऊन लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी शाळा व्यवस्थापनाचीही चौकशी केली जात आहे.