सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील अरण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाना पत्र लिहून एक आगळा-वेगळा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या या पत्रांचे दररोज परिपाठाच्या वेळी वाचन करण्यात येते.
जिल्ह्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे त्याला लढायला बळ दे, जनावरांना चारा दे, कोल्हापूर,सातारा, सांगलीतील पूरग्रस्तांना त्यातून बाहेर पडायला साकारात्कम ऊर्जा दे. अशा अनेक निरागस मागण्या विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाकडे केल्या आहेत.
गणपती बाप्पाला पत्र लिहावे अस या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं होत. त्यामुळं इयत्ता दुसरीपासून सातवी पर्यंतच्या शेकडो विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाला अशा अनेक मागण्यांची पत्रे लिहिली असून या पत्रांचे रोज परिपाठाच्यावेळी वाचन केलं जात आहे.