मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार ! पोलीस उपनिरीक्षकाने ठाण्यासमोरच घेतली ‘लाच’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताचा पंचनामा आणि अन्य कागदपत्रे देण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेताना दौलताबाद पोलीस ठाण्यात समोरच पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून काल रंगेहात पकडले. दौलताबाद पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वर्षभरातील ही तिसरी कारवाई आहे. रविकिरण आगतराव कदम (39) असे उपनिरीक्षकाचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, दौलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात तक्रारदाराच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी तक्रारदारास मोटार वाहन अपघात न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा दाखल करायचा आहे. याकरिता त्यांना अपघात स्थळाचा पंचनामा, शवविच्छेदनाला पूर्वीचा पंचनामा, एफआयआरची प्रत आणि अन्य कागदपत्रांची आवश्यकता होती. अपघाताचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविकिरण कदम कडे होता. यामुळे कदमकडे अपघात संबंधी कागदपत्रांची मागणी केली. कदमने 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी वडिलांच्या मृत्यूमुळे खूप दु:खी असल्याचे तसेच आर्थिक परिस्थिती पैसे देण्यासारखे नसल्याचे सांगितले. मात्र पैसे दिल्याशिवाय कागदपत्रे मिळणार नाहीत असे कदम यांनी बजावले.

तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाचेचा मागणीचे पडताळणी केली तेव्हाही कदमने 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. काल एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दौलताबाद पोलीस ठाण्याच्या परिसरात सकाळपासून सापळा रचला. कदमने पोलीस ठाण्या समोरच तक्रार दाराकडून लाचेचे 10 हजार रुपये घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडले. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी, अंमलदार विलास चव्हाण, मिलिंद इप्पर, सुनील बनकर, चंद्रकांत बागल यांच्या पथकाने केली.

Leave a Comment