महसूल राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात शवविच्छेदनासाठी मृतदेह नेला खांद्यावर

औरंगाबाद – जिल्ह्यातील सोयगाव ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने फर्दापूर येथील एका मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना चक्क मृतदेह खांद्यावर घेऊन शवविच्छेदन गृहाकडे जाण्याची वेळी आली. या प्रकाराबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. या मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार हे राज्याचे महसूल राज्यमंत्री आहेत तरीदेखील नागरिकांना मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फर्दापूर येथे आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह रविवारी रात्री सोयगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. परंतु आरोग्य विभागाच्या नियमानुसार रात्रीच्या अंधारात शवविच्छेदन होत नसल्याने या मृतदेहावर सोमवारी सकाळीच शवविच्छेदन करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. परंतु सोयगाव ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाची खिडक्या, दरवाजे पडक्या अवस्थेत असल्याने हा मृतदेह ठेवावा कसा असाही प्रश्न उपस्थित झाला.

यानंतर सोयगाव ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाच्या दुरवस्थेसोबतच शवविच्छेदन गृहाकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने सोमवारी हा मृतदेह चक्क नातेवाइकांना खांद्यावर उचलून शवविच्छेदन गृहाकडे आणावा लागला होता. सोयगाव ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्यासाठी रुग्णवाहिकेलाही रस्ता नाही. पायी जाणाऱ्यांना काट्यातून व कुपाटीतून वाट काढावी लागते. त्यामुळे खांद्यावर उचललेला मृतदेहाला शवविच्छेदन गृहाकडे आणण्यासाठी चक्क काट्यातून वाट काढावी लागली. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त होत आहे.