हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून राज्यात चांगलाच वाद पेटला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपटात दाखवलेल्या इतिहासावर आक्षेप नोंदवत जोरदार टीका केली होती. त्यानंतर सोशल मीडियावरही चित्रपटाला विरोध झाला. यानंतर आता झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याने पुन्हा वाद चर्चेत आला. या चित्रपटावरून सुबोध भावेने भविष्यात कोणताही ऐतिहासिक बायोपिक करणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापुरातील काही शिवभक्तांनी अभिनेता सुबोध भावेची नुकतीच भेट घेतली. या भेटीदरम्यान सुबोध भावे यांनी चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिकेविषयी माहिती दिली. यावेळी हर हर महादेव या चित्रपटात सुबोधने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला असून त्यातील काही उल्लेख आणि दृश्ये काढून टाकावेत, अशी मागणी शिवभक्तांनी केली.
यावेळी भावे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरील माझं प्रेम आयुष्यभर राहील. त्यांच्या चित्रपटातून मला जे काही मिळालं, ते मी मरेपर्यंत करत राहणार. पण यापुढे ऐतिहासिक चित्रपटातील भूमिका बापजन्मात करणार नाही. आता शूटिंग सुरू असलेला शेवटचा बायोपिक असेल, असे हात जोडत भावे यांनी म्हंटले.