हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या उलथापालथी झाल्या आहेत. आज विधिमंडळ परिसरात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी एकमेकांशी गप्पागोष्टी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यातच उद्धवजी पुन्हा एकदा शांतपणे विचार करा असं म्हणत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना भर सभागृहातच खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.
सभागृहात नेमकं काय घडलं ?
सुधीर मुनगंटीवार युती सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या वृक्षसंवर्धन मोहीमेविषयी सभागृहात बोलत होते. २०१६ मध्ये या योजनेची सुरुवात केली तेव्हा राज्याचे सर्व प्रमुख नेते तेथे उपस्थि होते असं त्यांनी म्हंटल. ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीही झाडे लावली आहेत, असा उल्लेख मुनगंटीवारांनी केला. तेव्हा तुम्ही लावलेल्या झाडांना फळं आलीच नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यावर प्रत्युत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, ‘झाडाला फळं येतील, असं आम्ही तुम्हाला सतत भेटून सांगत होतो. पण तुम्ही झाडाशी नातं तोडलं, त्याला आम्ही काय करणार? मी व्यक्तिगत येऊन तुम्हाला भेटत होतो. कोणत्या झाडाला कोणतं खत दिलं पाहिजे, हे सांगत होतो. पण तुम्ही झाडांना दुसरेच खत टाकले, मग त्याला फळं कशी लागणार, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.
त्यानंतर उद्धव ठाकरेंनी उत्तर देत तुम्ही मला खताबद्दल सांगत होतात की निरमा पावडरबद्दल असं म्हंटल असता मुनगंटीवार यांनी तात्काळा प्रत्युत्तर देत ते खतंच होतं, फक्त निरमा पाकिटामध्ये आणले होते, त्यावर नाव दुसरं होतं. पण तुमचा गैरसमज झाला. अजूनही काही बिघडलेलं नाही, उद्धवजी पुन्हा एकदा शांतपणे विचार करा, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यामुळे मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा युतीसाठी तर साद घातली नाही ना असा प्रश्न निर्माण झाला.