विशेष प्रतिनिधी । मागच्या वर्षीपासून सुरू झालेल्या ‘मी टू’ चळवळीनं अख्खं बॉलिवूड ढवळून निघालं. त्यानंतर आता साउथ मधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नाट्य कलाकार सुदीप्तो चटर्जी यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नाटकाच्या ग्रुपमधील एका विद्यार्थीनीवर अनेक महिने बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणामुळे सुदीप्तो यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आरोपीनं पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. तर दुसरीकडे सुदीप्तो यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.
बुधवारी रात्री हे सर्व प्रकरण उघडकीस आलं. पीडितेनं तिच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइटचा आधार घेतला. या मुलीनं सर्व माहिती दिल्यानंतर घटनेचा सविस्तर उलघडा झाला आहे. या विद्यार्थीनीनं सांगितलं की नाटकांच्या रिहर्सल दरम्यान तिला सुदीप्तो यांच्याकडून लैंगिक अत्याचार सहन करावे लागले. या प्रकरणी लगेचच कारवाई करत पोलिसांनी सुदीप्तो यांना अटक केली.
कोलकाता पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेनं सांगितलं की, सुदीप्तो यांनी तिला अभिनया दरम्यान श्वास घेण्याची टेक्निक शिकवण्याच्या बहाणा करुन मागच्या वर्षीच्या डिसेंबर पासून आतापर्यंत अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. या माहितीवरुन आम्ही आरोपीला अटक केली असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे.