सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये दोन मुलींसह विवाहितेने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली होती. मात्र तिने हे पाऊल का उचलले हे समजू शकले नव्हते. त्यानंतर आता या आत्महत्या प्रकरणाचा उलगडा करण्यास तालुका पोलिसांना यश आले आहे. या विवाहितेने सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून शेततळ्यात दोन्ही मुलींस उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच पती आणि सासऱ्यासह तिघांना अटक केली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे
पती आकाश ऊर्फ अक्षय उत्तम ढेकळे, सासरा उत्तम मच्छिंद्र ढेकळे, दीर अण्णासाहेब उत्तम ढेकळे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत तर अनिता उत्तम ढेकळे, पूजा अण्णासाहेब ढेकळे, विलास सुरवसे, सोजरबाई विलास सुरवसे, साळूबाई बाळा गुंड, बाळा गुंड, छकुली असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सासरच्यांकडून सतत मानसिक आणि शारिरीक छळ होत होता
मृत सारिका अक्षय ढेकळे हीचा चार वर्षांपूर्वी अक्षय ढेकळेसोबत विवाह झाला होता. यानंतर सासरच्या लोकांकडून सारिकाचा छळ करण्यात येत होता. सारिकाच्या माहेरच्या लोकांनी मानपान केला नाही, सोने दिले नाही याचा राग मनात धरून तिला सतत अपमानित करणे, नवीन कपडे न घेणे, उपाशी ठेवणे, माहेरी न पाठवणे, माहेरी फोनवर बोलू न देणे, दोन्ही मुलीच झाल्याने टोचून बोलणे, मारहाण करणे असा छळ सुरू केला.
शेततळ्यात उडी घेऊन केली आत्महत्या
यानंतर या सगळ्या त्रासाला कंटाळून अखेर मृत सारिकाने आपल्या दोन मुलींसह घरापासून काही अंतरावर असलेल्या शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृत सारिकाची आई लक्ष्मीबाई व्यंकट सुरवसे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पती आकाश ऊर्फ अक्षय उत्तम ढेकळे, सासरा उत्तम मच्छिद्र ढेकळे आणि दीर अण्णासाहेब उत्तम ढेकळे या तिघांना शनिवारी न्यायदंडाधिकारी आर. ए. मिसाळ यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.