धक्कादायक! PUBG खेळात टास्क पूर्ण करू न शकल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय युवकाची आत्महत्या

चंद्रपूर । PUBG खेळात टास्क पूर्ण करू न शकल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय युवकाची आत्महत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील माजरी कोळसा खाणीच्या गावातील ही घटना घडली. गौरव पाटेकर असं मृतक युवकाचे नाव आहे. लॉक डाऊनच्या काळात गौरवला पब्जी खेळण्याचे व्यसन जडले होते. मात्र एक टास्क पूर्ण होत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा त्याने मित्राला फोन केला आणि गळफास लावून आत्महत्या केली. माजरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

गौरव हा नागपूर येथील रायसोनी कॉलेज येथे बी.कॉम.(प्रथम वर्ष) अभ्यासक्रमाला शिकत होता. मात्र लॉक डाउन सुरु झाल्याने तो गेल्या 5 महिन्यांपासून माजरी येथील आपल्या घरीच राहत होता. कॉलेज नसल्यामुळे गौरवकडे भरपूर रिकामा वेळ होता. या रिकाम्या वेळात तो दिवस-रात्र मोबाईल मध्ये व्यस्त असायचा आणि पब्जी गेम खेळत असे. त्याच्या पालकांनी अनेक वेळा त्याला समजविण्याचा आणि यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण गौरवच्या वागण्यात फरक पडला नाही.

आई-वडिलांपासून लपून तो हा ऑनलाईन गेम खेळत असे. लॉकडाऊनच्या काळात त्याला या पब्जी मोबाईल खेळाचे जणू व्यसन जडले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी या पब्जी खेळातील एक टास्क पूर्ण होऊ न शकल्याने तो अस्वस्थ होता. अनेक वेळा प्रयत्न करून देखील तो हा टास्क पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे गौरवने आपल्या एका मित्राला फोन करून मी निराश झाल्याने आत्महत्या करत असल्याचे सांगितले. गौरवच्या मित्राने याची माहिती तातडीने त्याच्या भावाला दिली पण त्याचा भाऊ खोलीमध्ये जाऊन पाहतो. तोपर्यंत उशीर झाला होता. गौरवने पब्जीच्या नादात स्वतःच्या राहत्या घरी छताच्या पंख्याला गळफास लावून घेत जीवन संपविले होते. तरुण मुलाच्या अशा प्रकारच्या आत्महत्येने गौरवचे आई-वडील कोसळून पडले आहे. गौरवचा हा मृत्यू परिसरातील लोकांच्या मनाला चटका लावून गेलाय.

दरम्यान, या खळबळजनक घटनेची चौकशी माजरी पोलीस करत आहेत मात्र पब्जी खेळाचा व्यसनी-क्रूर चेहरा या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आला आहे. मेट्रो शहरांमध्ये असलेला ऑनलाईन गेमिंग चा विळखा आता ग्रामीण भागावरही घट्ट झालाय. ऑनलाईन गेम्स मुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे पण त्याच्या व्यसनाने आणि नैराश्यामुळे मुलं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताहेत हे अतिशय अस्वस्थ करणारे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like