संगमनेर प्रतिनिधी | स्वातंत्र्यानंतर गेले सत्तर वर्षे देशात राज्य चालवणा-या कॉंग्रेस अध्यक्षांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव होऊ शकतो तर मग बाळासाहेब थोरातांचा का नाही असे विधान भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. थोरातांच्या होमपिचवरून विखेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.
मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेचा रथ आजपासून पुन्हा धावायला लागणार आहे. विदर्भानंतर आता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ही यात्रा जाणार आहे. संगमनेरमध्ये होणा-ृया यात्रेची तयारी खासदार विखे करत असताना त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कॉंग्रेवर जोरदार टीका केली. विशेषत: कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना विखेंनी लक्ष केले.
तसेच आगामी विधनसभेत कोणत्याही परिस्थितीत नगर जिल्ह्यात १२ विरूद्ध ० करण्याचा निर्धार आपण आखलेला आहे. कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने कामाला लागावे, असं सुजय विखे म्हणाले. विखे पाटील आणि थोरात यांचे जुने राजकीय वैर आहे. या वैराला खुद्द शरद पवार यांनी देखील नेहमीच बळ दिले आहे. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांचा पराभव घडवून आणण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी जंगजंग पछाडले मात्र त्यांचा पराभव होऊ शकला नाही. मात्र आता सुजय विखे पाटील आपल्या मातोश्रींना थोरातांच्या विरोधात उतरवून त्यांचा पराभव करण्याचा डाव आखत आहेत.