औरंगाबाद – दिवसेंदिवस धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढतच आहे. अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरात दुचाकीचे तिन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात सहा जण जखमी, तर एक जण ठार झाल्याच्या घटना धुळे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील भालगाव फाटा ते पिंपळगाव फाट्यादरम्यान रविवारी (ता.१९) घडल्या आहेत.
पहिल्या घटनेत रविवारी संध्याकाळी रोहन सुभाष आगलावे (वय २०, रा. पांढरी, ता.औरंगाबाद) हा तरुण पिंपळगाव फाटा येथे मित्राच्या वाढदिवसाचा केक कापून घरी परत येत असताना पिंपळगाव फाटा येथे औरंगाबादकडुन भरधाव वेगाने आडुळकडे जाणाऱ्या कारने (एमएच २० सीएच ४३७०) रोहन याच्या दुचाकीला (एमएच २० सी ए ३१९७) जोराची धडक दिली. यात रोहन व कारमधील तिन जण जखमी झाले. जखमींना औरंगाबाद येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रोहन आगलावे या तरुणाचा मृत्यू झाला.
दुसऱ्या घटनेत मन्सुरखा महेबुबखा प़ठाण (वय ६०, राहणार आडुळ बु. ता.पैठण) है आडुळहुन कुंभेफळ येथे मोसंबी बागेच्या मोसंबी तोडण्यासाठी दुचाकी (एमएच २० ए एक्स २१०९) ने जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे भरधाव वेगाने जाणारी कारने (एमएच ४४ बी २४०७) भालगाव फाटा (ता.औरंगाबाद) येथे त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात मन्सूरखा पठाण हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहे. तर पिंपळगाव शिवारातील हॉटेल गीतांजलीजवळ चालु दुचाकीवर मागे बसलेली महिला व तिचा बाळ अचानक खाली पडल्याने दोन्ही जखमी झाले होते. भालगाव फाटा अपघाताची नोंद चिकलठाणा पोलीस ठाण्यात, तर पिंपळगाव फाटा येथील घटनेची नोंद करमाड पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, बिट जमादार रंजीत दुलत, विनोद खिल्लारे, सुनील गोरे,शेख आवेज यांनी घटनास्थळी भेट दिली.
मित्राला दिल्या उदंड आयुष्याच्या शुभेच्छा, पण स्वतः
मित्राचा वाढदिवस असल्याने पिंपळगाव फाटा येथे मित्राचा वाढदिवसाचा केक कापला. मित्राला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आणि परत घरी येत असतांना भरधाव कारने रोहनचे आयुष्य संपविले. मित्राचा वाढदिवस रोहनचा अंतिम दिवस ठरला.