हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्राचाळ प्रकरणी तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. राऊतांवरील कारवाईनंतर त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “संजय राऊत यांनी शिवसेना सोडावी म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, संजय बाळासाहेबांचा सैनिक आहे तो झुकणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे कुटूंबासोबत राहणार आहे. फासावर लटकावलं तरी तो शिवसेना सोडणार नाही, असे सुनील राऊत यांनी म्हंटले.
संजय राऊतांवरील ईडीच्या कारवाईनंतर त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांची चौकशी केली. जबाब घेऊ असे म्हणत अधिकारी त्यांना घेऊन गेले आहेत. मात्र, घरी केलेल्या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना काहीच सापडलेले नाही.
संजय राऊतांवर जी कारवाई झाली आहे ती चुकीची आहे. पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे एकही कागदपत्रे कागदपत्रे मिळालेली नाहीत. तरी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे सुनील राऊत यांनी म्हंटले.