Satara News : कंबलबाबावर जादूटोणा विरोधी कायद्याखाली तात्काळ कारवाई करा; ‘अंनिस’ ची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात असलेल्या कंबलबाबावर कारवाई करण्याची मागणी साताऱ्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. विशेष म्हणजे कंबलबाबा याच्याकडून केल्या जाणाऱ्या उपचाराचे व्हिडिओ भाजप आमदार राम कदम यांच्या फेसबुक वॉलवर आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सदर बाबाकडून अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींवर उपचार केले जात आहे. कंबलबाबा या नावाने ओळखला जाणारा राजस्थानातील एक भोंदू बाबा भाजप आमदार राम कदम यांच्या मतदारसंघातील विकलांग लोकांवर कंबल टाकून तथाकथित उपचार करत असल्याचे अनेक व्हिडिओ राम कदम यांच्या फेसबुक वॉलवर बघायला मिळतात. गणेश भाई गुर्जर, असे त्याचे मूळ नाव आहे. भोंदूबाबा करत असलेल्या या उपचारांच्या वेळी स्वतः आमदार राम कदम तसेच पोलीस अधिकारी देखील उपस्थित असलेले दिसतात.

गेली 10 वर्षे महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणे, चमत्कार करण्याचा दावा करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. आजवर जवळपास 1000 पेक्षा अधिक भोंदू बाबांवर या कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत.

कंबलबाबा या भोंदूबाबावर देखील पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करावा व पीडित व्यक्तींची ही क्रूर थट्टा थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मुक्ता दाभोलकर, डॉ हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, वंदना माने, डॉ. दिपक माने, शशिकांत सुतार, अँड. हौसेराव धुमाळ यांनी केली आहे.