हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मनी लाँडरिंग प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाकडून नवाब मलिक यांच्या जामीनात पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ करण्यात आली आहे. नवाब मलिक यांचे वैद्यकिय कारण लक्षात घेऊन कोर्टाने जामीनात तीन महिन्यांची मुदतवाढ केली आहे. यापूर्वी कोर्टाने मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन दिला होता. ज्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे.
मनी लाँडरिंग प्रकरणात दीड वर्ष जेलमध्ये राहिलेल्या नवाब मलिक यांना 11 ऑगस्ट रोजी वैद्यकीय कारणामुळे जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र अजून मलिक यांच्यात प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे त्यांना अंतिम जामीन देण्यात यावा, अशी मागणी त्यांच्या वकीलाने कोर्टाकडे केली होती. याच मागणीला सुप्रीम कोर्टाकडून मंजुरी मिळाली आहे. मलिक यांच्या वकिलाने आपल्या मागणीत म्हणले होते की, “मलिक यांची किडनी अजूनही योग्य पद्धतीने काम करत नाही. आम्ही ताजे रिपोर्ट सादर करत आहोत, वैद्यकीय कारण लक्षात घेऊन त्यांना जमीन द्यावा”
दरम्यान, नवाब मलिक कारावासाची शिक्षा भोगत असतानाच त्यांच्या प्रकृतीविषयीच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या वकिलाने कोर्टाकडे मलिक यांच्या जामिनासाठी मागणी केली होती. मलिक यांच्या प्रकृतीविषयी सर्व रिपोर्ट सादर केल्यानंतर कोर्टाने 14 ऑगस्टला वैद्यकीय कारणासाठी त्यांचा दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता पुन्हा न्यायलयाने नवाब मलिक यांना जामीन दिला आहे. ज्यामुळे त्यांना बाहेर राहून उपचार घेता येणार आहेत.