Suprem Court : बंडखोर आमदारांवरील कारवाईबाबत दिल्या ‘या’ सुचना; शिंदे सरकारवर काय परिणाम होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे व शिवसेनेसोबत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटा विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत तूर्तास कोणताही निर्णय घेऊ नये तसेच पुढील सुनावणी होईपर्यंत कारवाई करता येणार नाही, असे आदेश कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आज दिले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे समर्थक आमदारांच्या बाजूनेही निर्णय दिला आहे. शिवसेनेच्या 14 आमदारांविरुद्ध (उद्धव ठाकरे समर्थक) निलंबनाची कोणतीही कार्यवाही होऊ नये, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नुथलपती वेंकट रमणा यांनी यावेळी दिले. त्यामुळे याचा शिंदे सरकारवर काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.

दरम्यान, शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी बंडखोर आमदारांच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान कोर्टाच्या आजच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीबाबत नुकताच निर्णय दिला. त्यामध्ये कोर्टाने म्हंटले की, हे प्रकरण संविधानिकदृष्ट्या महत्वाचे आहे. त्यामुळे त्यावर तातडीने सुनावणी होऊ शकत नाही. त्याचबरोबर जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी होत नाही तोपर्यंत आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय घेऊ नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने यावेळी दिले.

सुप्रीम कोर्टात आज नेमके काय घडले?

आज, शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रकरण सुप्रीम कोर्टासमोर ठेवले, सिब्बल म्हणाले की, उद्या अपात्रतेबाबतचा मुद्दा विधानसभेत ऐकला जाईल. जर कोर्टानं आज सुनावणी घेतली नाही तर विधानसभा अध्यक्ष यावर निर्णय घेऊ शकतात. जोवर यावर कोर्ट सुनावणी करत नाही तोवर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेऊ नये, अशी मागणी सिब्बल यांनी कोर्टाकडे केली. यावर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी म्हटले की, या प्रकरणाची सुनावणी उद्या होऊ शकत नाही. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी घटनापीठ तयार करावे लागणार आहे. त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी करण्यास वेळ लागणार आहे.

Leave a Comment