हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निर्णयावर स्थिगिती देण्याचा अंतरिम आदेश देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता १७ मार्चला सुरू होणार आहे. या सुनावणी दरम्यान मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांचा उल्लेख केल्यानं सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारलं.
न्यायालयात सुनावणी सुरु असताना सदावर्ते यांनी एका मोठ्या नेत्यांच्या मुलीने आझाद मैदानात जाऊन सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव घेतल्याने न्यायाधीशांनी यावेळी राजकीय नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला जाऊ नये असं मत नोंदवलं. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून सुनावणी करणार आहोत. राजकीय नेत्यांची नावं घेतल्यास युक्तिवाद करण्याची परवानगी देण्यात येणार नाही असं यावेळी न्यायाधीशांनी गुणरत्न सदावर्ते यांना फटकारलं.
दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत इंदिरा साहनी प्रकरणी घटनापीठाने निश्चित केलेल्या आरक्षणावर ५० टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे या याचिकेत म्हटले आहे. राज्य सरकारने शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. मात्र, मुंबई हायकोर्टाने या संबंधातील याचिका फेटाळून लावली. या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज (बुधवार) सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला. मराठा आरक्षण प्रकरणात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, ज्येष्ठ विधीज्ज्ञ मुकुल रोहटगी व अन्य ज्येष्ठ वकील राज्य सरकार व आरक्षणाच्या समर्थनार्थ याचिकाकर्त्यांची बाजू मांडत आहेत.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.