आमदार अपात्र प्रकरणी सुप्रीम कोर्टाची शिंदे गटाला नोटीस; ठाकरे गटाला मिळाला दिलासा

Uddhav Thackeray Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वीच संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिला. या निकालात त्यांनी, “दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवता शिंदे गटाची शिवसेना ही खरी शिवसेना” असल्याचे जाहीर केले. मात्र हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिल्यामुळे या निकालाला विरोध करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने सुप्रीम कोर्टात धावून घेतली. आता ठाकरे कटारे दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील आमदारांना नोटीस बजावली आहे.

राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवण्यास नकार दिला होता. या विरोधातच उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या आधारावर आज सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, या नोटिसीमुळे शिंदे गटाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे, आमदार अपात्र प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे या प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यात ठाकरे आणि शिंदे गट निर्माण झाला आहे. सध्या या गटामध्ये शिवसेना पक्षावरून आणि पक्षाच्या चिन्हावरून वाद सुरू आहे. हे दोन्ही गट शिवसेना पक्षावर हक्क गाजवत आहेत. यातच राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने सुनावला आहे. या निकालानंतर पुन्हा ठाकरे गटाने शिंदे गटाला सुप्रीम कोर्टात खेचले आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट कोणाच्या बाजूने निकाल देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.