बारामतीतून सुप्रिया सुळेंच निवडणूक लढवणार; राजकिय चर्चांना पूर्णविराम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) बिगुल वाजायला अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळेच राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष संघटन बांधणीसाठी कामाला लागले आहेत. यात महाविकास आघाडीत जागा वाटपावर जोरदार चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच आता महाविकास आघाडीतर्फे बारामती (Baramati) मतदारसंघातून कोण उभे राहणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. कारण, स्वतः खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहतील अशी चर्चा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार देखील अजित पवारांना टक्कर देण्यासाठी मैदानात उतरतील असे म्हटले जात आहे. या सर्व चर्चांना आता पूर्णविराम देण्याचे काम सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर बारामती मतदारसंघ उमेदवार सुप्रिया सुळे, निशाणी तुतारी फुंकणार माणूस अशी जाहिरात ठेवली आहे. त्यामुळेच बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे याच उभ्या राहतील हे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच बारामती मतदारसंघातून आघाडीचा पहिला उमेदवार सुप्रिया सुळे असणार आहेत. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उभे केले जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी ननंद आणि भावजय आमने-सामने येथील ही चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे. यात निवडणुका तोंडावर आल्यामुळे सुनेत्रा पवार यांनी राजकारणात अधिक लक्ष घालत बारामतीत वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्याकडून विविध कार्यक्रम देखील राबवले जात आहेत. ही सर्व तयारी बघता सुनेत्रा पवार निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या पाहायला मिळत आहे.