घराणेशाहीच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंच सणसणीत प्रत्युत्तर; मी देशात पहिली आली तेव्हा दिसलं नाही का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांचीच पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड केल्यानंतर विरोधकांनी घराणेशाहीचा आरोप करत टीकेची झोड उठवली आहे. मात्र मला माझ्या घराण्याचा आणि मी शरद पवार यांची मुलगी असल्याचा अभिमान आहे. संसदेत जेव्हा माझा देशात पहिला क्रमांक आला तेव्हा ते काय माझ्या वडिलांनी मला पुरस्कार दिला नव्हता, त्यामुळे तेव्हा घराणेशाही दिसली नाही का? असं सणसणीत प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना दिले आहे.

पुणे येथे मीडियाशी संवाद साधताना पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाला सुप्रिया सुळे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. यावेळी त्यांना भाजपकडून करण्यात आलेल्या घराणेशाहीच्या आरोपांबाबत विचारलं असता होय, ही घराणेशाहीच आहे. ज्या घरात माझा जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी आहे याचा मला अभिमानच आहे. ज्या पक्षातील लोक आरोप करतात त्यांच्या पक्षातील घराणेशाही मी संसदेत डेटासहीत दाखवली आहे. त्यामुळे माझ्याकडे कोणी एक बोट दाखवत असेल तर ४ बोटे त्यांच्याकडे असणार आहेत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जेव्हा संपूर्ण देशात संसदरत्न म्हणून मी पहिली आहे तेव्हा शरद पवार यांची मुलगी म्हणून मला पुरस्कार नाही मिळाला. किंवा तिथे बसलेले जे प्रिन्सिपल आहेत ते तर माझे वडील नाहीत. असे असूनही मला सातत्याने संसदरत्न पुरस्कार मिळतोय, तेव्हा तुम्हाला घराणेशाही दिसत नाही का ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना केला आहे. सोयीप्रमाणे तुम्हाला घराणेशाही दिसते. त्यापेक्षा तुम्ही परफॉर्मन्स पहा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.