सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सुप्रियाताई सुळे, पंकजा मुंडे या दारू पिऊन नाचतात, या मतावर मी ठाम आहे. पतंगराव कदमांचा एक मुलगा झाडावर कसा गेला आणि मेला. कोणत्या पुढाऱ्याची पोरं दारू पित नाहीत. कराडचे आमदार बाळासाहेब पाटील याचं पोरंगही दारू पितो का नाही मी सांगतो तुम्हांला असे म्हणत राजकीय पुढाऱ्यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्ये ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी केलेली आहेत.
सातारा येथे आंदोलन स्थळी भाषण करताना बंडातात्या कराडकर यांनी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बंडातात्या कराडकर यांच्यासह व्यसनमुक्त युवक संघचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले आहे. पाेवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदाेलकांनी दंडवत घालून सरकाराच्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा विराेध केला आहे. यावेळी बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील गंभीर टीका केली आहे. ते पुढे म्हणाले, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. पवळा म्हणजे उध्दव ठाकरे आणि ढवळा म्हणजे अजित दादा. अजित दादाने दारू विकण्याचा गुण लावला. ज्ञानोबारायाची दिंडी नाही काढायची हे पण सांगितले.
मूठभर आमदारांच्यामध्ये विधानसभेत नव्हे हा दारूविक्रीचा निर्णय महाराष्ट्रामध्ये लादलेला आहे. त्याविषयी अत्यंत पोटतिडकीने काम करणारी एकच संस्था व्यसनमुक्ती संस्था आहे. 1996 पासून हे काम आम्ही करत आहोत. केवळ समाजाच्या कल्याणासाठी काम करत आहोत. शासनाला इशारा देण्यासाठी आज अत्यंत शांततेने आंदोलन केले आहे. पुढील काळात हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल. वाईन विक्रीची धुंदी कधी उतरेल आणि हा निर्णय मागे घ्यावाच लागेल, असाही इशारा ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे.