Tuesday, January 31, 2023

शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली असून त्यांना तातडीने एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईत हलवण्यात आले आहे. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. जैन यांना न्यूमोनियाची लागण झाल्याचे लक्षात आल्यावर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत दाखल करण्यात आले आहे.

घरकुल घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरेश जैन यांना अटक झाली होती. 29 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी जैन यांच्यासह 47 जण दोषी ठरले होते. पण दोन आठवड्यांआधीच जैन यांना नियमित जामीन मंजूर झाल्यानं ते जळगावात परतले होते. सुरेश जैन यांना काल मध्यरात्रीच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

उपचारा दरम्यान त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याचे निदान डॉक्टरांनी केल्यानंतर अधिक उपचारांसाठी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित उपचार सुरु करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.