ठाकरेंना कोकणात मोठा धक्का! माजी आमदार सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश

Suryakant Dalvi joins BJP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला एक एक धक्के बसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना गेली आहे. तर आता माजी आमदार सूर्यकांत दळवी (Surykant Dalvi) यांनी ही उद्धव ठाकरे यांना ठेंगा दाखवत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे.”आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक बाळासाहेब जेव्हा गेले तेव्हा सगळं संपलं आमचं, असं म्हणायची वेळ आज आली आहे” असे म्हणत सूर्यकांत दळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यांनी गुरुवारी ठाकरे गटाची साथ सोडत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना, “शिवसेनेचा विचारही हिंदुत्वाचा होता भाजपाचा ही विचार हा विशाल आहे. त्यामुळे येथे चांगल्या प्रकारे काम करता येईल, म्हणूनच आम्ही भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे” असे सूर्यकांत दळवी म्हणाले.

त्याचबरोबर, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी सांगितलं होतं की, हा माझा हिरा आहे. याला कधी हात लावू नका, परंतु बाळासाहेब गेल्यानंतर तसं कधी झालं नाही. आम्ही काम करत असताना सातत्याने सूचना करण्यासाठी वेळ मागत होतो, पण ती वेळही आम्हाला दिली गेली नाही. मग आमच्यासमोर कोणता पर्याय नव्हता” असे देखील दळवी यांनी म्हणले आहे.

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू तसेच निष्ठावंत कार्यकर्ते अशी सूर्यकांत दळवी यांची ओळख होती. ते सलग 25 वर्षे आमदार राहिले. परंतु पक्षांतर्गत असलेल्या वादामुळे आणि उद्धव ठाकरेंवरील नाराजीमुळे दळवी यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना हा मोठा धक्का बसला आहे.