सुशांतसिंह हत्याप्रकरणाच्या CBI तपासाला वेग; एम्सच्या डॉक्टरांकडून पोस्टमोर्टम रिपोर्टची तपासणी

मुंबई । सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला वेग आला असून सीबीआयकडून सुशांत सिंहच्या पोस्टमोर्टम रिपोर्टची तपासणी करण्यात येणार आहे. सीबीआयने शुक्रवारी सुशांतच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी एम्समधील फॉरेन्सिक विभागाची मदत मागितली. सीबीआयने एम्सला पाठवलेल्या पत्रात वैद्यकीय कागदपत्रं, शवविच्छेदन अहवाल, व्हिडीओ तसंच गरज असणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या जातील असं सांगितलं आहे. एम्सचे डॉक्टर मुंबईत येण्याचीही शक्यता आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, एम्सकडून ५ डॉक्टरांची टीम गठीत करण्यात आली आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्याकडे डॉक्टरांच्या टीमचं नेतृत्त्व करणार आहेत. “हत्येची शक्यता आम्ही पडताळून पाहणार आहोत. मात्र यावेळी इतर सर्व बाबीही तपासल्या जातील,” असं डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सांगितलं आहे. “टीम सुशांतच्या शरीरावर असणाऱ्या जखमा आणि परिस्थितीजन्य पुरावे यांच्यातील साधर्म्य तपासून पाहणार आहे. याशिवाय सुशांत मानसिकरित्या त्रस्त असल्याने घेत असलेल्या औषधांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न असेल,” अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

सीबीआयची टीम आज सुशांतच्या वांद्रे इथल्या घरी पोहोचली आहे. याच घरात सुशांतसिंहचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. या भेटीत या प्रकरणातील काही धागेदोरे सापडतात का यासाठी सीबीआय कसून तपासणी करणार आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी सीबीआयनं सर्वातआधी सुशांतच्या स्वयंपाकी निरजची चौकशी केली होती. त्याचा जबाब नोंदवून घेण्यासाठी त्याला गेस्टहाउसला नेण्यात आलं होतं. तीन तासांहून जास्त काळ ही चौकशी सुरू होती. सीबीआयचे अधिकारी सुशांतचा मित्र आणि मॅनेजर सिद्धार्थ पिठानी आणि स्वयंपाकी निरज यांना घेऊन आज सुशांतच्या घरी पोहोचले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”