हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून विविध हॉस्पिटलमध्ये लहान बालकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानभवनात आक्रमक झाले. लहान बालकांचा अशाप्रकारे मृत्यू होणं ही गंभीर बाब आहे त्यामुळे बालकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी फडणवीस यांनी केली.
सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात एनआयसीयूमध्ये ४ बालकांचा मृत्यू झाला आहे, दोन बालकं व्हेंटिलेटरवर आहेत, वातानुकूलित यंत्रणात शॉर्ट सर्कीट झालं, यासंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही.तीन दिवस याकडे कुणी लक्ष दिलं नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
२०, २१ आणि २२ डिसेंबरदरम्यान ३ बालकांचा मृत्यू झाला. दोन तासांपूर्वी चौथं बालक गेलं. अशा प्रकारची चूक जर येथे होत असेल तर आरोग्य विभाग ज्यांच्याकडे आहे. त्यांनाही निलंबित करण्यात यावं. अशी मागणी फडणवीस यांनी केली. फडणवीस यांच्या मागणीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित वॉर्डचे वैद्यकिय अधिकाऱ्यांना निलंबित करत असल्याची घोषणा केली.