कोरेगाव | तालुक्यातील वाठार स्टेशन येथे चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करुन पतीने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. पहाटे झालेल्या या घटनेने वाठार स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पत्नी पूजा अजय भिसे (वय -२५) असे उपचार सुरू असलेल्या महिलेचे नाव आहे. तर अजय राजेंद्र उर्फ राजाराम भिसे (वय- 35, रा. रविवार पेठ वाई) यांनी पत्नीवर हल्ला करून आत्महत्या केली आहे
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजय भिसे व पूजा भिसे यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता. बुधवारी 29 सप्टेंबरला रात्री अजय व त्याची पत्नी पूजा यांच्यामध्ये भांडण झाल्याने पूजा ही गुरुवारी पुण्याला निघून गेली. त्यानंतर पुजाची बहीण सुजाता घोलप व तिची आई रंजना दोरके या दोघी पूजाला वाठार स्टेशन येथे आणण्यासाठी पुणे येथे गेल्या. पुणे येथून काल साडेचार वाजता वाठार स्टेशन येथे आल्या. माहेरी वाठार स्टेशन येथे येवून पूजाने वडिलांना भांडण झाल्याचे सांगितले. पती अजय भिसे याला आपली पत्नी वाठार येथे माहेरी आल्याचे समजल्यानंतर तो काल रात्री एक वाजता सासरी वाठार स्टेशन येथे आला.
कौटुंबिक वादाविषयी चर्चा होत असताना, पहाटे पाचच्या सुमारास अजयने किचनमध्ये असलेली कुऱ्हाड हातात घेऊन कॉटवर झोपलेल्या पत्नीच्या तोंडावर व पाठीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले. त्यानंतर तिथून पलायन करून पहाटे सहा वाजता पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेच्या खाली आत्महत्या केली. पूजा हीस सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करीत आहेत.