सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
पंजाबच्या भठिंडा जिल्ह्यातील सैन्य तळावर दि. 12 एप्रिल बुधवारी गोळीबाराचा प्रकार घडला. यात दुर्दैवाने चार जवानांना प्राण गमवावे लागले. यातच सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामधील करंदोशीतील जवान तेजस मानकर याचा गोळीबारात संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. सैन्य दलाचे अधिकारी मेजर भट्टाचार्य यांनी जावळी तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना केलेल्या मेलनुसार जवान तेजस मानकर यांचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी दुपारपर्यंत त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
तेजस मानकर हे दोन वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले असून नुकतेच पुणे येथील प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची पंजाब या ठिकाणी नियुक्ती करण्यात झाली होती. लहानपणापासूनच घरामध्ये सैनिकी वातावरणामुळे त्याच्यावरही चांगला प्रभाव होता. सैन्य दलामध्ये भरती होण्याचा त्याने निश्चय केला होता. नुकतेच सहा महिन्यापूर्वी त्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण करून पंजाब प्रांतात देशसेवेसाठी रुजू झाले होते. दरम्यान घडलेल्या घटनेमुळे जावळी तालुक्यासह करंदोशी गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सैन्य दलातील परस्परातील मतभेदामुळे गोळीबार झाल्याचा पंजाब पोलिसांचा व सैन्य दलातील पोलिसांचा संशय आहे. एशियन न्यूज वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार संबंधित गोळीबार हा दहशतवादी घटना नसल्याचे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले असून सध्या या घटनेवर हेलिकॉप्टर आणि ड्रोन च्या मदतीने निगराणी केली जात आहे.
याप्रकरणी काही संशयीतांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित सैन्य तळावर बाहेरून आलेल्या व्यक्तीने हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे. परस्परांमधील मतभेदामुळे जवान मरण पावले आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस महानिर्देशक एडीजी सुरेंद्र पाल सिंह परमार यांनी कोणताही अतिरेकी हमला नसल्याचा दुजोरा दिला आहे. संबंधित गोळीबाराच्या या घटनेत चार जवानांचा मृत्यू झाला असून यामध्ये संशयास्पद मृत्यू जावळी तालुक्यातील तेजस मानकर या जवानाचा झाला असून राज्य पोलीस त्याचबरोबर कृती दलाचे लष्करी अधिकारी घटनास्थळावर तात्काळ दाखल झाले व त्यांनी घटनास्थळावरून संबंधित माहिती घेतली असल्याचे समोर आले आहे.
कोण आहे तेजस मानकर?
भारतीय सैन्यदलातील जवान तेजस मानकर याचे गाव सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील करंदोशी हे आहे. तेजसच्या घराला सैन्याची परंपरा असून त्यांचे वडील माजी सुभेदार आहेत. तर भाऊ सैन्यदलात मेजर पदावर कार्यरत आहे. तसेच चुलते ही सैन्य दलात आहेत. तेजसचे प्राथमिक शिक्षण करंदोशी येथे झाले असून माध्यमिक शिक्षण त्यांनी वडिलांबरोबर मिलिटरी कॅम्प मध्ये पूर्ण केले होते. तेजसच्या पश्चात आई मनीषा, वडील लहुराज, भाऊ मेजर ओंकार असा परिवार आहे.