सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
पूर्व परवानगीशिवाय मायनर इरिगेशन कर वसूल केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी दत्त इंडिया साखर कारखान्यावर राडा केला. कार्यकर्ते व कर्मचार्यांत जोरदार वादावादी झाली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. कारखाना कार्यस्थळावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा व इतर कार्यकर्ते दत्त इंडिया कारखान्यात मायनर इरिगेशनच्या पाणीपट्टी संदर्भात निवेदन देण्यास गेले होते. यावेळी राजोबा म्हणाले,” मायनर इरिगेशनने कारखानदारांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय शेतीची पाणीपट्टी ऊस बिलातून परस्पर कपात केली आहे. हा एकप्रकारे शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. कारखानदारांचा हा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही. कारखानदारांनी कपात केलेली रक्कम तात्काळ एकरकमी परत करावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.”
याबाबत कारखाना प्रशासनाने कानावर हात ठेवले. त्यामुळे संघटना कार्यकर्ते संतप्त झाले. कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन केल्येन वाद चिघळला. दोन्ही गटात जोरदार वादावादी झाली. त्यामुळे कारखाना प्रशासनाने मोठ्या प्रमाणामध्ये पोलिस बंदोबस्त मागविला. कारखाना परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.