जालना :-जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचा आंबिया बहार २०२० चा मंजूर झालेला मोसंबी फळ पिक विमा अद्यापर्यंत मिळाला नाही.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ३० नोव्हेंबर रोजी विमा कंपनी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एचडीएफसी आरगो या विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी बुधवार (ता.२५) रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मोसंबी फळपिकाचा विमा मंजूर झालेला असतानाही अद्याप पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला नाही. शासन निर्णयामध्ये असं नमूद करण्यात आले आहे की अधिसूचित पिकाचा संरक्षण कालावधी संपल्यानंतर तीन आठवड्यात विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणे बंधनकारक आहे.
मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे.तब्बल दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनी दिरंगाई करीत आहे. संघटनेच्या वतीने वारंवार या कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला. दर वेळी आठ दिवसाची मदत या कंपनीकडून मागण्यात येत होती. विमा जमा करण्यासाठी तारीख पे तारीख असे होत असल्याने शेतकर्यांच्या संयमाचा बांध फुटत आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप पिके हातची पूर्ण गेलि.फळपिके उद्ध्वस्त झाले. आता विम्याच्या पैशावर पुढील बहराचे व्यवस्थापन शेतकरी करणार असून येणारा आंबिया बहार व्यवस्थापनाचे काम व मशागतीचे काम सध्या सुरू आहे. या बहाराच्या व्यवस्थापनासाठी व खते औषधी यासाठी या पैशाचे खरी गरज असतानाही विमा कंपनीने अद्याप पर्यंत हा विमा वाटप केल्या नाही.
जिल्ह्यातील सुमारे ३२ कोटी रुपये विमा वाटप कंपनीच्या चालढकल पणामुळे रखडले आहेत. हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर हे ३२ कोटी रुपये जमा झाले तर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेकडो शेतकऱ्यांसह या विमा कंपनी कार्यालयात जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत मुक्काम ठोकू आंदोलन करण्यात येणार आहे. असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिले आहे.या निवेदनावर अंकुश तारख, बाबासाहेब दखणे, रवींद्र घाडगे, गणेश गावडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.