सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
‘ऊस तोडणी मजुरांनी तोडीसाठी दिवसा ढवळ्या दरोडा टाकला आहे ती रक्कम शेतकर्यांना परत द्या किंवा कारखान्याकडून होणारी ऊस तोडणीची कपात बंद करा तसेच ऊस संपेपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवा,’ या मागणीचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी तक्रारी करा पैसे वसूल करून देवू, अशी ग्वाही देवून ऊस संपेपर्यंत कारखाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती दिली.
राजू शेट्टी व महेश खराडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ते सांगलीत खासगी कार्यक्रमा निमित्त आले असता सदर निवेदन दिले. या निवेदनात म्हंटले आहे कि, तोडणी मजूर, वाहन चालक आणि मशीन मालक व स्लीपबॉय यांनी संगनमताने दरोडा घातला आहे. तोडणीसाठी पाच हजारांपासून वीस हजांरापर्यंत पैसे उकळले आहेत, साखर कारखाने ही शेतकर्याच्या ऊसबिलातून तोडणीची रक्कम कपात केली जाते ती कपात थांबवावी एकाच कामासाठी दोनदा पैसे द्यावे लागत आहेत.
कपात किंवा टोळीवाल्याच्या तोडणी बिलातून ती रक्कम वसूल करून द्यावी ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. तसेच जिल्ह्यात अद्याप मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. तो ऊस संपे पर्यंत कारखाने सुरू ठेवा अन्यथा ऊस जिल्हाधिकारी कार्यालयात टाकणार असाही इशारा दिला आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.