कराडात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीची जय्यत तयारी

शंभूतीर्थावर आकर्षक सजावट : बाईक रॅली, व्याख्यानासह विविध कार्यक्रम

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची 365 वी जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी केली जात आहे. दरम्यान कराड येथील भेदा चौकात (शंभूतीर्थ) या ठिकाणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त शिवतीर्थ परिसरात पताका, कमानी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जयंतीनिमित्त सायंकाळी महिलांची पारंपरिक वेशात बाईक रॅली काढण्यात येणार असून शंभूजन्माचा पाळणा त्यानंतर व्याख्यान असा कार्यक्रम होणार आहे.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त कराड येथील भेदा चौकात भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आज सकाळी 8.30 वाजता शिवतीर्थावर गुढी उभारण्यात आली. तसेच 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आले. यावेळी किल्ले पुरंदरवरून आणलेल्या ज्योतीचे स्वागत भाजप नेते अतुल भोसले. नगरसेवक सौरभ पाटील यांच्यासह विविधमान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवतीर्थावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. भेदा चौकातील आयलॅंड परिसरातील जागेला तिन्ही बाजूंनी आकर्षक पताका लावून विदयुत रोषणाई देखील करण्यात आली आहे. या परिसरातील सर्व रस्त्यांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून शिवतीर्थावर करण्यात आलेली आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. भेदा चौकात भव्य अशा प्रकारचा शामियाना उभारण्यात आलेला असून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

सायंकाळी 5 वाजता 365 माता-भगिनींची पारंपरिक वेशात बाईक रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली शंभूतीर्थावर आल्यानंतर शंभूजन्माचा पाळणा म्हंटला जाणार आहे. त्यानंतर व्याख्याते प्रा. अरूण घोडके (इस्लामपूर) यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. कराड शहरात प्रथमच भव्य स्वरूपात होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सव कार्यक्रमास शिव-शंभूप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

‘या’ ठिकाणी असणार पार्किंगसाठी व्यवस्था

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहर व तालुक्यातील शिव-शंभूप्रेमी मोठ्या संख्येने कराड येथे दाखल होणार आहेत. त्यामुळे त्याच्या वाहनाच्या पार्किंगची कोणत्याही स्वरूपाची गैरसोय होऊ नये याची विषयच काळजी संयोजकांकडून घेण्यात आलेली आहे. दरम्यान शिवतीर्थ ठिकाणी येणाऱ्या चार चाकी व दुचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था रत्नागिरी गोडावून, बैलबाजार रस्ता, छत्रपती संभाजी भाजी मार्केट या ठिकाणी करण्यात आली आहे.