कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये; पवारांवरील केतकीच्या ‘त्या’ पोस्टवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठीतील छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे हिने आज तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. या पोस्टनंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, केतकीने केलेल्या प्रकारावरून तिच्यावर राजकीय नेत्यांकडूनही टीकेची झोड उठवली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केतकीच्या पोस्टवर सडकून टीका केली असून या लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही. कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, अशा शब्दांत राज यांनी एक पत्रक ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे.

आज केतकी चितळे हिने शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह फेसबुक पोस्टवरून राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पत्र लिहीत समाचार घेतला आहे. त्यांनी पत्रात लिहले आहे की, “कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दांत काहीतरी श्लोकांसारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे अस नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.

याचबरोबर राज ठाकरे यांनी पुढे असे लिहले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत. आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे.

अशा प्रकारचे लिखाण करणे ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे. तिला वेळीच आवर घालायला पाहिजे. चांगल्याला चांगल आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवतानी आपल्याला शिकवल. कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा, अशा प्रकारे राज ठाकरे यांनी पत्र लिहीत आपली भूमिका मांडली आहे.

केतकी चितळेची नेमकी फेसबुक पोस्ट?

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. केतकीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहले की, तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll, ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक, सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll, समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll, ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll, भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll, खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll, याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll असा ओळी केतकीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत.