कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नियोजित स्मारक व पूर्णाकृती पुतळा शंभूतीर्थ व शंभूसृष्टी कराडमध्ये शंभूतीर्थ चौकात उभारण्यात येणार आहे. स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या जनसंपर्क कार्यालयाचे करवडीच्या महालिंगेश्वर विजय लिंग महाराजांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमास भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्यासह कराड तालुका व परिसरातील शंभूप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी या शंभू स्मारकाला स्व इच्छेने देणगी देणाऱ्यांसाठी पावती पुस्तक तसेच गुगल पे अकाउंटचे ओपनिंगही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कराडमध्ये साकारणारे हे भव्य दिव्य स्मारक देशातील एक अनोखे स्मारक असणार आहे. स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या या नियोजित स्मारकामध्ये शंभू तीर्थ व शंभू सृष्टी उभारण्यात येणार आहे. या शंभूसृष्टीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा चित्रमय रूपात पहावयास मिळणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे अतुलनीय शौर्य यांनी केलेल्या लढाया यांचे सचित्र दर्शन शंभू सृष्टी मधून घडणार आहे.
या शंभू तीर्थावर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून हे स्मारक संपूर्ण महाराष्ट्रातील शंभू प्रेमींसाठी एक आदर्श स्मारक असणार आहे. या शंभूतीर्थ व शंभू सृष्टीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या या भव्य दिव्य स्मारकास कराड तालुका तसेच परिसरातील शंभूप्रेमींनी सहकार्य करावे, असे आवाहन स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले.