घर बनवणाऱ्या हातांनी मुलीला घडवलं, मुलीनही नाव कमवलं; अधिकारी बनलेल्या कोमलची यशोगाथा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुली मोठ्या झाल्या कि बापाचं नाव मोठं करतात, असं म्हंटलं जात. होय त्या नाव कमवतातच आणि बापाचं नाव मोठं करतात. हे करून दाखवलं आहे सातारा जिल्ह्यातील पूर्व दुष्काळी भागातील मार्डी गावातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या कोमलने. कोमलला लहानपणापासून अतिशय हालाकीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. अनेक कठीण संकटात तिच्या वडिलांनीही कधी हार मानली नाही. मूळ गवंडीची व्यवसाय करणाऱ्या वडिलांनी आपल्या लेकीची शिकण्याची इच्छा पूर्ण केली आणि लेकीनही अधिकारी होऊन नाव कमवलं. चला तर मग पाहूया विक्रीकर निरीक्षक अधिकारी बनलेल्या कोमलची यशोगाथा…

कष्टकरून अधिकारी बनलेली कोमल सावंत हि सातारा जिल्ह्यातील पूर्व दुष्काळी भागातील मार्डी गावातील राहणारी. सावंत कुटूंबात जन्मलेल्या कोमलने घरच्या परिस्थितीवरती मात करत केवळ जिद्द, चिकाटी, सातत्याच्या जोरावर एमपीएससमध्ये यश संपादन केले आहे. ज्यावेळी कोमलचा परीक्षेचा निकाल लागला आणि तिने हि सर्वप्रथम बातमी आपल्या कुटुंबियांना दिली. पोरगी अधिकारी बनणार असल्याची बातमी ऐकताच बापाच्याही डोळ्यात आनंदाचे अश्रू आले.

शिक्षणाची फारशी पार्श्वभूमी नसलेल्या आणि आई घरकाम तर वडील गवंडी काम करत असलेल्या कुटूंबातील कोमलने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षा दिली. दिवसरात्र अभ्यास करून चांगले यश मिळाले आहे.

माझी मुलगी मोठी अधिकारी झाली हो…

घरची प्रतिकूल परिस्थिती असताना आकुंश सावंत यांनी गवंडी काम करून मुलांना शिक्षण दिले. ही कौतुकास्पद बाब आहे. कोमलने आईवडिलांच्या घरकामास मदत करत शालेय शिक्षण घेतले. आपल्या वडिलांना आपली मुलगी कुठली अधिकारी झाली हे अजूनही माहिती नाही ते स्वतः बोलतात की, माझी मुलगी मोठी अधिकारी झाली.

गावकऱ्यांनीही काढली कोमलची वाजत गाजत मिरवणूक

दुष्काळी भागातील विद्यार्थीनी कोमलने स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्याने संबंध तालुक्यात याची चांगलीच चर्चा होत आहे. कारण दुष्काळी भागातील विद्यार्थी उच्च पदावर नोकरीला लागणं म्हणजे मोठा आनंदच असतो. अशात कोमलनं एमपीएसी परीक्षेत यश मिळवल्याने गावकऱ्यांनी तिची फटाक्यांची आतषबाजी करत ताशे, ढोल तूतारी निनादामध्ये गावातून भव्य मिरवणूक काढली.

अपयशाने खचून न जाता दिली पुन्हा परीक्षा

कोमलचे प्राथमिक शिक्षण मार्डी जिल्हा परिषद शाळा, तसेच पुढे रयतेच्या दहिवडी कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. 2018 मधील महाराष्ट्र राज्यसेवा आयोग परीक्षेत अपयश आले. मात्र, खचून न जाता जिद्द, चिकाटीच्या जोरावर 2020 मध्ये राज्यकर निरीक्षकसाठी चौथा क्रमांकाने पास झाली. विक्रीकर निरीक्षक आधिकारीसाठी 2 क्रमांकाने कोमलने यश संपादन केले.