भटक्या कुत्र्यावर तलवारीने हल्ला, तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

सांगली | सांगलीतल्या संजयनगर परिसरातील झेंडा चौक येथे भटकी कुत्री त्रास देत असल्याच्या कारणातून तरुणाने तालवारीनेच चक्क कुत्र्यावर हल्ला करत त्याला ठार केले. या परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास हि बाब आली. सदरची घटना १ मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चिन्मय पार्क रोडवरील सोनार मळा समोर घडली. या प्रकरणी पोलीस शिपाई मोहन माळी यांनी फिर्याद दिली.

तलवारीने हल्ला करणाऱ्या नियाज बशीर फकीर याच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई मोहन माळी हे दुचाकीवरुन संजयनगर परिसरात पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग करत असताना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झेंडा चौक ते चिन्मय पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील सोनार मळा येथे आले असता त्यांना लोकांची गर्दी झालेली दिसली. त्याठिकाणी ते निघाले असता त्यांना बघून संशयित फकीर याने हातातील तलवार खाली फेकून दिली.

यावेळी माळी यांनी जाऊन पहिले असता एक भटके श्वान मृत अवस्थेत पडले होते. त्यावेळी माळी यांनी चौकशी केली असता, संशयित बशीर याने परिसरातील भटके श्वान हे खूप त्रास देत असल्याने त्या श्वानाच्या मांडीवर तलवारीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले व त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले.

You might also like