सोलापूर| राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला कमळ फुलविण्यात यश मिळताना दिसत आहे. अद्याप 7 फेऱ्यांची मतमोजणी बाकी असली तरी भाजपाचे समाधान आवताडे हे तब्बल 6 हजार 112 मतांनी आघाडीवर आहेत.
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे राज्याच लक्ष लागलं आहे. मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरूवाती झाली होती. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी 3 लाख 40 हजार 889 मतदारांपैकी 2 लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केलं आहे. विधानसभा मतदारसंघात 65.73 टक्के मतदान झाले. या मतमोजणीसाठी 118 अधिकारी, कर्मचारी आणि मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत 2 मे रोजी शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. 14 टेबलांवर 38 फेऱ्यात मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणीसाठी 6 टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत. टपाली मतदानाच्या मोजणीसाठी दोन टेबल ठेवण्यात आलेत. तसेच 54 अधिकारी, कर्मचारी आणि मदतनीस राखीव ठेवण्यात आलेत. टपाली मतदानाद्वारे 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी 3 हजार 252 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच 73 सैनिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
कोरोना चाचणी बंधनकारक
मतमोजणी केंद्रात येणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी तसेच इतरांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ज्यांनी कोरोना चाचणी केली नाही, अशा संबंधितांसाठी मतदान कक्षाबाहेरील आरोग्य कक्षात चाचणी केली जाईल. तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्यास त्यांनाच मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.