वाई | सातबारावरील 32 गची नोंद कमी करण्यासाठी मदतनिसाच्या माध्यमातून केवळ 2 हजारांची लाच स्वीकारताना सोनगिरवाडी व सिद्धनाथवाडीचे तलाठी पांडुरंग जगन्नाथ भिसे (वय- 52, रा.फ्लॅट नं. 104, विराटनगर, ता. वाई), तसेच त्याचा खासगी मदतनीस संतोष चंद्रकांत भिलारे (वय- 43, रा. धावडी, ता. वाई) या दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
याबाबतची माहिती अशी, तक्रारदार यांनी चुलत भावाकडून खरेदी केलेल्या दोन गुंठे प्लॉटचे सातबारावरील 32 गची नोंद कमी करण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केला होता. याची नोंद कमी करण्यासाठी तलाठी पांडुरंग भिसे यांनी दोन हजार रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून तलाठी भिसे यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांचा खासगी मदतनीस भिलारे यास लाचेची रक्कम स्वीकारताना पकडले.
सदरील कारवाई लाचलुचपत विभाग पुण्याचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन राऊत, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक विक्रम पवार, पोलिस नाईक श्री. ताटे, श्री. खरात, श्री. अडागळे, पोलिस काटकर, सातारा लाचलुचपत विभाग यांनी केली.