काबूल । अफगाणिस्तानमध्ये तालिबान आपले वर्चस्व वाढवत आहे. एक एक करून तालिबान प्रांतीय राजधानी आणि सरकारी मालमत्ता काबीज करत आहेत. बुधवारी तालिबान्यांनी भारताने भेट म्हणून दिलेले MI-24 हेलिकॉप्टर देखील ताब्यात घेतले आहे. तालिबानने कुंदुज विमानतळावर उभे असलेले MI-24 हेलिकॉप्टर ताब्यात घेतले आहे. त्याचवेळी तालिबानने कंदहार जेलवरही हल्ला केला आणि तेथील राजकीय कैद्यांना पळवून नेले.
भारताने 2019 मध्ये अफगाण हवाई दलाला 4 MI-24 हेलिकॉप्टर भेट दिली. मात्र, तालिबानने पकडलेले हे हेलिकॉप्टर उडण्याच्या स्थितीत नाही. अफगाण हवाई दलाने आधीच त्याचे इंजिन आणि इतर भाग बाहेर काढले होते. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी कुंडुजमध्ये हेलिकॉप्टर पकडल्याची पुष्टी केली. मात्र, हे भारताकडून मिळालेले हेलिकॉप्टर आहे की नाही याची पुष्टी केलेली नाही.
तालिबानने तुरुंग तोडल्याचा व्हिडिओ जारी केला
त्याचवेळी, तालिबानने कंदहार जेल तोडून त्याचा कैद्यांना बाहेर काढण्याचा व्हिडिओ देखील जारी केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, दहशतवादी जेल तोडून तिथे बंदिस्त असलेल्या कैद्यांना कसे सोडत आहेत ते पाहिले जात होते. या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की,हे तेच जेल आहे जिथून तालिबान दहशतवादी संघटनेला त्यांच्या कैद केलेल्या साथीदारांची सुटका करायची होती. यापूर्वी जुलै महिन्यात देखील या जेलवर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, पण त्यावेळी त्यांना यश मिळाले नव्हते.
तालिबान 3 महिन्यांत काबूल काबीज करेल
दरम्यान, अमेरिकन तज्ज्ञांचा एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये असे सांगितले गेले आहे की, तालिबान 3 महिन्यांच्या आत काबूल काबीज करू शकतो. अमेरिकेच्या सरकारी अधिकाऱ्यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की, तालिबान अमेरिकेच्या अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने अफगाणिस्तानातील शहरे काबीज करत आहेत. 10 ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी ईशान्य बदाखशान प्रांताची राजधानी फैजाबादही ताब्यात घेतली.
आतापर्यंत तालिबान्यांनी 9 राजधान्या ताब्यात घेतल्या
तालिबानने 5 दिवसात 9 प्रांतांची राजधान्या काबीज केल्या आहेत. त्यांची नावे जरांज, फराह, सार-ए-पुल, शबरघन, आयबक, कुंदुज, फैजाबाद, पुल-ए-खुमरी आणि तलोकान आहेत. या शहरांना त्यांच्या प्रांतांची नावे देण्यात आली आहेत. कुंडुज, सार-ए-पोल आणि तलोकानपासून उत्तरेकडे इराणच्या सीमेला लागून असलेल्या निमोरोज प्रांताची राजधानी जरांजपर्यंत तालिबानचे नियंत्रण आहे. त्याचबरोबर तालिबानने उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या नौगाझान प्रांताची राजधानी शबरघनवरही कब्जा केला आहे.
पाकिस्तानने तालिबानला आश्रय देऊ नये – अफगाणिस्तान
दरम्यान, संयुक्त राष्ट्रातील अफगाणिस्तानचे स्थायी प्रतिनिधी गुलाम मोहम्मद इशाकझाई यांनी संयुक्त राष्ट्रांना (UN) तालिबानला विनाशकारी गट घोषित करावे आणि त्याविरोधात त्वरित कारवाई करावी, असे आवाहन केले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले आहे की, संयुक्त राष्ट्रात अफगाणिस्तानच्या नवनियुक्त राजदूताने आंतरराष्ट्रीय समुदायाला सावधगिरी बाळगण्याचे आणि पाकिस्तानातील तालिबान केंद्रांवर दबाव आणण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी याआधी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांना अफगाणिस्तानच्या सीमेवरील दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान नष्ट करण्यास सांगितले होते.