काबूल । अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आपले अंतरिम सरकार स्थापन करणाऱ्या तालिबानने आता काश्मीरच्या मुद्यावर भारताला दणका दिला आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर काश्मीर ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे म्हटले होते, मात्र त्यानंतर तालिबानकडून असे वक्तव्यही करण्यात आले की,” ते काश्मीरच्या दुःखी मुस्लिमांसाठी आवाज उठवत राहतील.”
तालिबानचे प्रवक्ते आणि अफगाणिस्तानचे उपसूचना मंत्री जबीहुल्ला मुजाहिदने पाकिस्तानच्या एका टीव्ही चॅनेलला मुलाखत देऊन या गोष्टी सांगितल्या. जबीहुल्ला मुजाहिद म्हणाला की,”जगभरात अशी काही क्षेत्रे आहेत जिथे मुस्लिमांना अन्यायकारक वागणूक दिली जात आहे, मग ते पॅलेस्टाईन असो, काश्मीर असो किंवा म्यानमार असो. अशा पीडित मुस्लिमांसाठी आम्ही आवाज उठवत राहू.”
जबीहुल्ला मुजाहिद म्हणाला,”जिथे जिथे मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत, ते चिंताजनक आहे. आम्ही त्याविरोधात आहोत. आम्ही जम्मू -काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाचाही निषेध करतो. अफगाणिस्तान सरकार जगाच्या विविध भागातील दु: खी मुस्लिमांना राजनैतिक आणि राजकीय मदत पुरवत राहील.”
तालिबानच्या प्रवक्त्याने मुलाखतीत पाकिस्तानचे खुलेपणाने कौतुक केले आहे. मुजाहिदने एका पाकिस्तानी टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “तालिबानच्या लक्षात आले आहे की, पाकिस्तानने अफगाणिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे.” अफगाणिस्तानात इस्लामी राजवटीला पाठिंबा दिल्याबद्दल तालिबानकडून पाकिस्तानचे कौतुक करण्यात आले आहे.