काबूल ।अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 103 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही संख्या वाढतच आहे. दरम्यान, असे सांगितले जात आहे की, काबुल विमानतळाच्या स्फोटात 28 तालिबान्यांचाही मृत्यू झाला आहे. असा दावा रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. तालिबाननेही याला दुजोरा दिला आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, हे तालिबानी काबूल विमानतळाच्या बाहेर तैनात होते. तालिबानचे म्हणणे आहे की,” आम्ही या स्फोटांमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त लोकं गमावली आहेत.”
वृत्तसंस्थेनुसार, ISIS या दहशतवादी संघटनेच्या खोरासन ग्रुप (The Islamic State Khorasan Province) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी म्हटले आहे की,” मृतांमध्ये 13 मरीन कमांडोचा समावेश आहे, तर 15 जखमी झाले आहेत.”
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या पेंटागॉनने सांगितले- “पहिला स्फोट गुरुवारी हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एबी गेटवर झाला. त्यानंतर थोड्याच वेळात, विमानतळाजवळील बॅरन हॉटेलजवळ दुसरा स्फोट झाला. ब्रिटिश सैनिक इथेच थांबले होते. तीन संशयित विमानतळाबाहेर दिसले. त्यापैकी दोन आत्मघाती हल्लेखोर होते, तर तिसऱ्याने बंदूक आणली होती. या हल्ल्यानंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे बंद करण्यात आली.
विमानतळावर लोकं अजूनही विमानाची वाट पाहत आहेत
यूएस सेंट्रल कमांडचे जनरल मॅकेन्झी म्हणाले-“सध्या 5 हजार लोकं काबूल विमानतळावर फ्लाइटची वाट पाहत आहेत. त्यापैकी 1 हजार अमेरिकन आहेत. 14 ऑगस्टपासून आम्ही एक लाख चार हजार नागरिकांना बाहेर काढले आहे. यापैकी 66 हजार हे अमेरिकन नागरिक आहेत आणि 37 हजार आपले मित्र आहेत.”
तालिबानने पाकिस्तानला दुसरे घर म्हंटले
दरम्यान, तालिबानने पाकिस्तानशी असलेली जवळीक मान्य केली आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानी चॅनेल ARY न्यूजशी केलेल्या संभाषणात म्हटले आहे की,” पाकिस्तान त्यांच्या संघटनेसाठी (तालिबान) दुसरे घर आहे.” जबीउल्लाहने असेही म्हटले आहे की,” अफगाणिस्तानची सीमा पाकिस्तानला लागून आहे. या दोन्ही देशांची लोकं धार्मिक कारणामुळेही एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. म्हणूनच आम्हाला पाकिस्तानसोबतचे संबंध आणखी दृढ करायचे आहेत.”
काश्मीरबाबत भारताला दिला सल्ला
जबीउल्लाहने भारताशी देखील चांगल्या संबंधांबद्दलही बोलले आहे. ते म्हणाले की,” आमची एकच इच्छा आहे की भारताने आपली धोरणे अफगाणांच्या हितानुसार ठरवावीत.” तालिबानच्या प्रवक्त्याने भारताला काश्मीरबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की,” दोन्ही देशांचे हितसंबंध एकमेकांशी निगडित आहेत, त्यामुळे प्रत्येक वादग्रस्त मुद्दा एकत्र बसून सोडवला गेला पाहिजे.”