कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
मराठ्यांनी दक्षिणेत दोनशे वर्षांहून अधिक काळ राज्य केले. त्यामुळे तेथील चित्र, शिल्प, संगीत, नाट्य, साहित्य आदींवर मराठीचा ठसा आहे. विशेषतः तंजावरमध्ये मराठी संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही घट्ट आहेत, असे प्रतिपादन मराठी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ‘तंजावरमधील मराठी संस्कृती’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. निशा पवार होत्या.
डॉ. मोरे म्हणाले, कोल्हापूरचे तंजावरशी घनिष्ठ संबंध होते. शहाजीराजे यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठीचा ठसा तंजावरमध्ये उमटवला. संपूर्ण भोसले कुलात ज्ञानाची लालसा आणि मोठा व्यासंग होता. यातूनच तंजावरमध्ये 80 मीटर लांबीचा देशातील सर्वाधिक लांबीचा शिलालेख कोरला गेला आहे. मराठी भाषेतील अनेक हस्तलिखिते उपलब्ध आहेत. मराठी साहित्य आणि नाटकाच्या क्षेत्रात तंजावर प्रांत खूपच प्रगत होता. मराठी नाटकांचा इतिहास विष्णुदास भावे यांच्यापासून सुरू होतो, असे मानले जाते. परंतु त्याच्याही आधी दीडशे वर्षे तंजावरमध्ये नाटकांचे लिखाण झाले आहे. त्याकाळातील समाज बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक होता.
तंजावर परिसरातील सण आणि उत्सवांवर मराठी संस्कृतीचा ठसा ठळकपणे उमटला आहे. लग्नविधी, दिवाळी, दसरा आदी सण महाराष्ट्रातूनच तिकडे गेले. तेथील मराठी बांधव आजही मोठ्या दिमाखात महाराष्ट्रीयन पद्धतीने सण साजरे करत आहेत. तंजावरमधील मराठी भाषेचा तमिळ भाषेची संपर्क आला. मात्र, शिवकालीन मराठी भाषा मात्र आजही तेथे तशीच आहे. तंजावर छपाईच्या क्षेत्रातही प्रगत होते. कोलकाता येथील श्रीरामपूरमध्ये पहिले पुस्तक छापल्याचे दाखले इतिहासात आहेत. परंतु त्याच्याही आधी तंजावरमध्ये छापखाना होता आणि त्यावर पुस्तके छापली जात होती, अशी माहिती डॉ. मोरे यांनी दिली.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.